“कोंढवा बुद्रुकमध्ये बोगस शिक्षण सम्राटांचा भांडाफोड! शासन अनुदानात ११.२६ लाखांचा घोटाळा – १०० दिवस पोलीस स्टेशनकडून ‘विलंब’!”
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
पुणे | १२ नोव्हेंबर २०२५
पुण्यातील शिक्षण विभागातील भोंगळ कारभाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोंढवा बुद्रुक येथील इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या
श्रीशिवछत्रपती बालक मंदिर व ॲक्टिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल या शैक्षणिक संस्थेत तब्बल ₹११,२६,४३८ रुपयांचा मोठा अनुदान घोटाळा उघड झाला असून, शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
शिक्षण विभागाच्या चौकशीत उघड झाल्यानुसार—
संस्थेतील खजिनदारानेच स्वतःला ‘बोगस शिपाई’ म्हणून नेमून घेतलं आणि शासनाच्या तिजोरीतून लाखो रुपये उचलले. चौकशीत हे संपूर्ण प्रकरण उघड झाले असून शिक्षण विभागाने बोगस शिपाईची मान्यता तसेच अनुदान आदेश तात्काळ रद्द केले आहेत.
याप्रकरणात शिक्षण विभागाने संस्थेच्या अध्यक्ष रमेश गायकवाड आणि बोगस शिपाई नाना मोहिते यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे लेखी आदेशही दिले. उपशिक्षणाधिकारी यांनी स्वतः कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली, परंतु FIR नोंदविण्यास तब्बल १०० दिवसांचा विलंब झाला. या काळात काही प्रभावशाली व्यक्तींनी पोलिस आणि प्रशासनावर दबाव आणल्याचे गंभीर संकेत समोर आले आहेत.
सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर FIR नोंद झाली असून हे प्रकरण आता जनतेच्या न्यायालयात पोहोचले आहे.
शिक्षण विकणाऱ्यांना आणि शासन निधी लुटणाऱ्यांना आता त्याच शैलीत उत्तर मिळेल!
कितीही मोठं नाव असलं तरी आम्ही सत्य थांबू देणार नाही.
हा लढा जनतेच्या न्यायालयात सुरू आहे.” — समाजसेवक गणेश नायकवडे
या प्रकरणाने केवळ एका शैक्षणिक संस्थेचा नव्हे, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेतील सुरू असलेल्या बोगसगिरी, भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप आणि प्रभावशाली व्यक्तींच्या दबाव तंत्रांचा भंडाफोड केला आहे.
शिक्षणाचं पवित्र मंदिर पुन्हा स्वच्छ करण्यासाठी सुरू झालेली ही लढाई आता जनतेच्या न्यायासाठी निर्णायक टप्प्यात दाखल झाली आहे.



