पुण्यातील कोंढव्यात अन्नसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! ‘सनराईस स्वीट’मधील उत्पादनांच्या दर्जाची FDA चौकशी कधी?
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस…
सनराईस स्वीट’मधील उत्पादनांच्या दर्जा व स्वच्छतेबाबत आरोप; अप्पर परिसरातील दत्त डेअरीच्या तुपात भेसळीचा संशय; निकृष्ट कच्चा माल, अस्वच्छ परिसर आणि अन्ननिर्मितीच्या स्वच्छतेबाबत गंभीर आरोप…
पुणे : अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध अन्न व्यवसाय आणि अन्नभेसळीविरोधात कारवाईची अपेक्षा वाढली आहे. मात्र, पुणे शहरातील कोंढवा बुद्रुक परिसरात अन्नपदार्थांच्या निर्मितीचा दर्जा, स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांच्या पालनाबाबत नागरिकांकडून काही तक्रारी आणि आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नसून, संबंधित आस्थापनांची प्रत्यक्ष तपासणी आणि नमुना चाचण्यांनंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकते.
सनराईस स्वीट’मधील उत्पादनांबाबत नागरिकांची चिंता
कोंढवा बुद्रुक परिसरातील हॉस्टेल चौक येथील ‘सनराईस स्वीट’मध्ये शेंगदाणा लाडू, खोबऱ्याची बर्फी आणि चिक्की यांसारखे खाद्यपदार्थ तयार केले जात असल्याचे सांगण्यात येते. या उत्पादनांसाठी कथितरीत्या निकृष्ट दर्जाचा कच्चा माल वापरला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच, पदार्थ तयार करण्याच्या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव असल्याचे आणि जमिनीवर बसून खाद्यपदार्थ बनवले जात असल्याचेही आरोप आहेत.
कामगारांकडून हातमोजे आणि हेअर कॅपचा वापर होत नसल्याचे, तसेच कामगारांच्या आरोग्य तपासणीबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. खाद्यपदार्थ प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये भरताना स्वच्छतेचे योग्य निकष पाळले जातात का, याचीही तपासणी होणे आवश्यक आहे.
या ठिकाणी तयार होणारे पदार्थ झोपडपट्टी परिसरातील किराणा दुकाने आणि लहान टपऱ्यांवर विक्रीसाठी जात असल्याची माहिती समोर येत असल्याने, या उत्पादनांचा दर्जा आणि त्यांची वितरण साखळी तपासण्याची मागणी होत आहे. विशेषतः लहान मुलांकडून खाल्ल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाने कोणतीही तडजोड करू नये, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
दत्त डेअरीच्या तुपात भेसळीचा संशय?
बिबवेवाडी अप्पर परिसरातील दत्त डेअरीमधून गाईचे तूप खरेदी केल्यानंतर त्यामध्ये वनस्पती तुपाची भेसळ असल्याचा संशय आल्याचे काही नागरिकांनी सांगितले आहे. यासंदर्भात संबंधित प्रशासनाकडे तक्रार केल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
मात्र, तुपामध्ये प्रत्यक्ष भेसळ आहे किंवा नाही, हे अधिकृत प्रयोगशाळेतील तपासणी आणि प्रशासनाच्या निष्कर्षांनंतरच स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे संबंधित नमुने तातडीने तपासून अहवालानुसार योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
अन्न निरीक्षकांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
परिसरात बेकरी उत्पादने, स्वीट मार्ट, तूप-लोणी आणि दुग्धजन्य पदार्थ तयार करणारे व्यवसाय सुरू असताना, त्यांची नियमित तपासणी होते का? अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कोणती कारवाई केली जाते? अन्न निरीक्षकांकडून नमुने घेतले जातात का? असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
अन्न व औषध प्रशासनाकडून मोठ्या व्यावसायिकांवर कारवाई होत असताना, लहान उत्पादक आणि स्थानिक व्यवसायांचीही तितक्याच गांभीर्याने तपासणी होते का, याबाबत स्पष्टता आवश्यक आहे. प्रशासनाची कारवाई केवळ प्रसिद्धीपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष अन्ननिर्मितीच्या ठिकाणी पोहोचली पाहिजे, अशी मागणी होत आहे.
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लक्ष घालण्याची मागणी
अन्नपदार्थांमध्ये भेसळ, निकृष्ट कच्च्या मालाचा वापर किंवा अस्वच्छ वातावरणात उत्पादन होत असल्याचे आरोप खरे आढळल्यास त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे कोंढवा बुद्रुक परिसरातील संबंधित अन्ननिर्मिती केंद्रे, स्वीट मार्ट, बेकरी आणि दुग्धजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांची अचानक तपासणी करण्यात यावी.
तपासणीदरम्यान कच्च्या मालाची गुणवत्ता, उत्पादनस्थळाची स्वच्छता, कामगारांचे वैयक्तिक स्वच्छतेचे निकष, अन्नपदार्थांचे नमुने, परवाने आणि साठवणूक व्यवस्था यांची पडताळणी करावी. नियमभंग आढळल्यास कायद्यानुसार कारवाई करून त्याची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
आता प्रश्न एवढाच आहे की, कोंढवा बुद्रुकमधील या आरोपांची FDA प्रशासन दखल घेऊन प्रत्यक्ष तपासणी करणार का? की नागरिकांना अन्नसुरक्षेबाबतच्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार? आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या प्रकरणात लक्ष घालून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



