पुणे शहरातील गणेशोत्सव निर्विघ्न पार; तब्बल ३३ तासांची विसर्जन मिरवणूक शांततेत संपन्न


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

पुणे शहरातील गणेशोत्सवाचा विसर्जन सोहळा अखेर तब्बल ३३ तास ३३ मिनिटांनंतर संपला. शनिवारी सायंकाळी सुमारे ६.१५ वाजता ‘महाराष्ट्र तरुण मंडळा’चा गणपती लकडी पुलाच्या दिशेने रवाना झाल्यानंतर यंदाच्या विसर्जन मिरवणुकीची सांगता झाली. मात्र, मानाच्या गणपतींच्या विसर्जनानंतरही लक्ष्मी रोड, कुमठेकर रस्ता, टिळक रोड यांसह शहरातील विविध मार्गांवर प्रमुख गणेश मंडळांच्या मिरवणुका संथ गतीने पुढे सरकत असल्याचे चित्र दिसून आले.

पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण असलेल्या अलका टॉकीज चौकात शनिवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत मोठी गर्दी पाहायला मिळाली. अनेक गणेश मंडळांच्या मिरवणुका उशिरापर्यंत सुरू राहिल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.यंदाच्या विसर्जन मिरवणुकीपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने डीजे आणि लाऊडस्पीकरच्या वापराबाबत नियम घालून दिले होते. तसेच पुणे पोलिसांनीही मिरवणुका सुरक्षित आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने गणेश मंडळांना विविध सूचना व आदेश दिले होते. मात्र, काही ठिकाणी या नियमांचे पालन झाले नसल्याचा आरोप होत असून, मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजातील डीजे, साऊंड सिस्टीम तसेच आक्षेपार्ह गाण्यांवर तरुणाई नाचताना दिसून आली.
शनिवारी सायंकाळी पाच वाजल्यानंतरही अलका टॉकीज चौक परिसरात काही गणेश मंडळांच्या डीजे आणि साऊंड सिस्टीमचा आवाज सुरू असल्याचे दिसून आले. त्यामुळे न्यायालयीन निर्देश आणि पोलिसांच्या आदेशांच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित झाले.
दरम्यान, काही ठिकाणी बंदोबस्तावर असलेले पोलिस अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवताना दिसले. सोशल मीडियावर तसेच प्रत्यक्ष मिरवणुकीदरम्यान नियमभंगाच्या घटनांबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले.
विसर्जन मिरवणूक पूर्ण झाल्यानंतर पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. पुणेकर नागरिक, गणेश मंडळे आणि गणेशभक्तांनी विसर्जन सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांनी आभार मानले. भविष्यातही शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणेकरांचे सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
विसर्जन मिरवणुका अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडल्याचेही पोलिस आयुक्तांनी सांगितले. तसेच डीजे आणि लाऊडस्पीकरच्या वापराबाबत घालून दिलेल्या नियमांचे १०० गणेश मंडळांनी उल्लंघन केले, असे म्हणणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, ज्या गणेश मंडळांकडून नियमांचे उल्लंघन झाले आहे, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
यंदाचा गणेशोत्सव पुणे शहरात मोठ्या उत्साहात आणि तुलनेने शांततेत पार पडला असला, तरी ३३ तास ३३ मिनिटे चाललेल्या विसर्जन मिरवणुकीमुळे वेळेचे नियोजन, ध्वनिप्रदूषण आणि नियमांची अंमलबजावणी हे मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!